भटक्या
Powered By Blogger

Saturday, March 27, 2010

Friday, March 26, 2010

विंदांचा "अलविदा"

             विंदा म्हणजे मराठी साहित्याच्या प्रांतातील अनेक Stalwarts पैकी एक. ज्ञानपीठ पुरस्कार, जनस्थान पुरस्कार सहित अनेक पुरस्कारांचे मानकरी. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्याचे फार मोठे नुकसान झाले आहेत. एक श्रेष्ट दर्जाचा कवी आणि तितक्याच उंचीचा माणुस अशी त्यांची ओळख मराठी जनमानसांत नेहमीच राहील. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जगाला काव्य देणारे आणि मृत्युनंतरही जगाला आपले पार्थिव देणार्‍या विंदांनी अखेरपर्यंत आपले 'देण्याचे व्रत' कायम ठेवले. त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यांच्याच कवितेत असे व्यक्त झालेले होते.


                          " देणार्‍याने देत जावे,

                            घेणार्‍याने घेत जावे.

                            घेता घेता एक दिवस..

                            देणार्‍याचे हात घ्यावे."


विंदांच्या जीवनातून इतका धडा आपण घेतला तरि पुष्कळ झाले......

Wednesday, March 24, 2010

जागतिकिकरण आणि धर्म

नुकताच मीरा नंदा यांचा " The Gospel of Globalisation: against All Hope, secularism remains a Myth" हा Nirmukta.com माझ्या वाचनात आला. जागतिकीकरणानंतर आणि मुक्त अर्थ्व्यवस्थेच्या प्रभावामुळे लोकांच्या मनातील धर्म भावना कमी झाली आहे, ह्या मुद्याला मीरा नंदा यांचा प्रमुख आक्षेप आहे. भारतातील सद्यस्थिती आणि The Evolution of God (2009)- by Richard Wright व God is Back- by Micklethwait and wooldrige ह्यांच्या पुस्तकांचा आधार घेऊन ह्या विदुषीने आपला सिद्धांत पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेचे गोडवे गाणार्‍या, स्व:ताला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्‍या विचारवंतांच्या काही भ्रामक समजुती (Myths) आहेत. त्या म्हणजे- १. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे समाजात आर्थिक समृद्धीबरोबर नास्तिकता वाढली. २. मुक्त अर्थव्यवस्थेपाठोपाठ वैयक्तिक पातळीवर धर्मभावना वाढली असली असे मानले तरी त्याचा सामाजिक स्वास्थ्यावर फारसा परिणाम झाला नाही ३. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे कर्मकांडांचे प्राबल्य कमी होऊन नि़खळ धर्मभावना वाढीला लागली. ४. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे आर्थिक खुलेपणाबरोबर लोकांचा दृष्टिकोणात सुद्धा मोकळेपणा आला, वै़ज्ञानिक दृष्टिकोणात आणि तर्कसंगत विचारांचे प्रस्थ वाढले.




मीरा नंदा यांच्या मते, धर्मनिरपेक्ष विचारवंताच्या ह्या समजुती भ्रामक ठरवण्याइतपत सभोवतालची परिस्थिती आहे. राज्यशासन, जनता, खाजगी कंपन्या ह्या सर्व पातळ्यांवर धर्माचे मायाजाल पसरत चालले आहे. अहोरात्र चालणारे अध्यात्मिक चॅनेल्स आणि रोज नव्या घोटाळ्यात अडकुनही नव-नव्या अध्यात्मिक गुरुंचा होणारा उदय आणि त्याच्या भजनी लागणारे असंख्य भक्तगण हे वास्तव मात्र वेगळेच चित्र दाखवते. सन २००९ च्या NES सर्व्हेमध्ये असे दिसुन आले की ४०% दलित आणि ४३% आदिवासी यांनी दैंनदिन पूजाअर्चा केली होती, ही आकडेवारी सन २००४ च्या सर्व्हेच्या आकडेवारीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ही बाब स्पष्ट होते की जागतिकीकरणामुळे आर्थिक उत्पन्नाचा स्तर उंचावलेल्या मागास वर्गाचाही नास्तिकतेकडे कल झुकण्याकडे धार्मिकतेकडे कल झुकत आहे. बरं, हे केवळ आपल्याकडेच नाही तर मॉडर्न समजल्या जानार्‍या अमेरिका, ग्रेट ब्रिटन इथेही आस्तिकवाद्यांची majority वाढत आहे. God Is Back ह्या पुस्तकाच्या लेखकांनी पाश्चिमात्य देशांत ख्रिश्चन धर्मसंस्था व शासनसंस्था ह्यांच्यात वाढणारे साटेलोटे संबंधावर प्रकाश टाकला आहे. तिकडे धर्म हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेला तोलुन धरणारा एक आवश्यक घटक समजला जाऊ लागला आहे.



तसे पाहता, मीरा नंदा यांच्या निरिक्षणात बर्‍याच अंशी तथ्य आहे. समजात ओतप्रेत भरुन वाहणारी धार्मिकता आपल्याला सर्वत्र पहावयास मिळते. खुल्या आर्थिक धोरणांमुळे माणसाच्या भौतिक प्रगतीमध्ये वाढ झाली असली तरी सामजिक-आर्थिक पातळीवर मात्र फार मोठा दबाव त्याला सहन करावा लागतोय. जागतिकीकरणात 'स्पर्धा' हा मूलमंत्र आहे. Survival of Fittest चा संघर्ष मानवी समाजाच्या इतिहासात कधी नव्हे इतका जिवघेणा बनलाय. रोज नवी माहिती, रोज नवे तंत्रज्ञान हे एका बाजुला तर; जडत्ववादी मुल्य व समाजव्यवस्था दुसर्‍या बाजुला यांच्या मध्ये मनाची चिरफाड सगळ्यांनाच झेपते असे नाही. ह्या अस्थिर जगण्यामुळे मग दैवावरचा विश्वास वाढतो. पुर्वी आदिमानव गुहेत रहायचा. नैसर्गिक आपत्ती, सौरमंडळातील घडामोडी ह्यांच्या कार्यकारणभावाविषयी अनभिज्ञ असल्यामुळे त्याने त्यांना दैवत्व बहाल केले आणि निर्धास्त होऊन गेला. त्यामुळे अतिवृष्टीमुळे अन्न-निवारा नष्ट होवो वा अनावृष्टीमुळे अन्नाअभावी मरण येवो, दोन्हीची जबाबदारी वरुण देवतेवर टाकुन तो निवांत जगायला मोकळा झाला. आज वैज्ञानिक प्रगतीमुळे बहुतांशी नैसर्गिक आपत्तींमागचा कार्यकारण भाव समजला तरी त्या घटनांवर माणसांचे अजुन नियंत्रण आलेले नाही. सामाजिक, आर्थिक व्यवस्थेतील परस्पर संबंध जितका घनिष्ट आणि जटील तितकी त्यामध्ये होणारी उलथापालथ अधिक वेगवान आणि सर्वव्यापी. आता तर, जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या गेल्याने एका ठिकाणी होणारी घडामोड फार दूरपर्यंत प्रभाव टाकते. उदा.-अमेरिका-युरोपमधील कारखान्यांनी Global Warming केल्याने माले नावाचे बेट काही वर्षात पाण्याखाली जाईल. पण तिथल्या आदिवासिला मात्र त्यातले काहीच गम्य नसल्याने त्याच्या लेखी ती अनाकलनीय घटना असेल. अमेरिकेत 'लेह्मन ब्रदर्स' ही कंपनी खड्ड्यात गेल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत जी उलपालथ झाली तिचा परिणाम अंतिमतः आपल्यालही भोगावयाला लागणार आहे ह्याचे भाकीत नाशिक-नागपुरातल्या मध्यमवर्गिय गुंतवणुकदाराला कसे कळणार? त्यामुळे अर्थाअर्थी कोणताही संबंध नसतानाही आपण परिणामाचे भागिदार होऊ शकतो ही भावनाच माणसाला हतबल बनवते. " कुठे काही आणि काय होइल याचा नेम नाही" म्हणुन निर्माण होणार्‍या माणसिक तणावातुन मुक्त होण्यासाठी कुणी धर्माच्या वळचणीला गेला तर नविन असे काही नाही.



जगण्यातील अनिश्चितता ही अनादि काळापासुन मानवी समाजात आहे. पूर्वी ती केवळ पददलित समाजापुरतीच मर्यादित असायची आता मात्र ती सर्व समाजात पसरलीय. पण केवळ ह्या मुद्द्यावरुन जातिकिकरणाला दोषी ठरवणे मात्र चुकीचे आहे. फार तर ह्याला नव्या समाजरचनेच्या निर्मिती प्रक्रियेतील एक अपरिहार्य घटना म्हणावी लागेल.



रोज सकाळी कार्यालयात जातांना मी 'लोदी रोड' वरच्या साई मंदिरातील गर्दी पाहत असे. आता, हा लेख वाचल्याने गर्दिचे मानसशास्त्र मात्र थोडे कळु लागलेय.

Thursday, March 11, 2010

मी दिल्लीत आल्याला आता चार महीने उलटून गेलेत. डिसेंबर-जानेवारी महिन्यातील बोचरी थंडी जाऊन आता कडक उन्हे जाणवू लागली आहेत.   दिल्लीतल्या वातावरणाला शरिराने जमवून घेतले आहे पण दिल्लीच्या ख़ास अश्या संस्कृतीशी जमवून घेणे अद्यापही सुरूच आहे.

 

दिल्ली आपली राजकीय राजधानी. म्हणून तीचा न्याराच तोरा. रुंद रस्ते, मोठाल्या बागा-बगीचे, भव्य म्हणू शकेल इतक्या मोठ्या सरकारी इमारती, आणि हिंदी भाषेच्या उच्चाराचे असंख्य प्रकार. ही काही वैशिष्ट्ये आपल्याला चटकन जाणवतात.

मराठी माणुस दिल्लीत आल्यावर पहिल्यांदा बावरतो तो हिंदी भाषेला. आपल्याकडे जी हिन्दी भाषा बोलली जाते, त्यात मराठी व्याकरणाचा मोठा प्रभाव असतो. एखाद्याला ' तुम' असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा समोरच्याने ' आपण किंवा तुम्ही ' असा अर्थ घ्यावा अशी आपली अपेक्षा असते. पण दिल्लीत रिक्शावाल्याला जर तुम्ही 'तुम' म्हणाल तर तो अंगावर ओरडत म्हणेल " भाई, ज़रा तमीजसे बात करो." सरकारी कार्यालयात तर मराठी लोकांच्या हिंदी भाषेच्या अडाणीपणामुळे खूप प्रश्न निर्माण होतात.

हिंदीभाषेच्या पाठोपाठ दिल्लीची खाद्यसंस्कृती सुद्धा पचनी पडायला वेळ जावा लागतो. पनीर, आलू, मूली आणि बटर तसेच राजमा, काली दाल इ. चा सर्वव्यापी संचार दिसतो. सुरवातीच्या काही दिवसांत पनीर, आलु यांच्या मार्‍याने इतका वैताग आला की पुन्हा वर्षभर तरी हे पदार्थ खाणार नाही अशी भीम-प्रतिद्ना केली. पण पर्यायी पदार्थांअभावी ती प्रतिद्ना पाळणे फार जड गेले. आताशा भेंडी, मेथी इ. तत्सम पदार्थांच्या 'डिशेस' मिळणार्‍या धाब्यांची माहिती मिळतेय. संधी मिळताच वाट वाकडी करुन आम्ही तेथे जात असतो.

देशाची राजकिय राजधानी, सत्त्ताधिशांची निवासस्थाने, विविध कार्यालये, विदेशी सचिवालये, इ. मुळे दिल्ली शहर राजकिय-सामाजिकदृष्ट्या नेहमीच अत्यंत संवेदनशील-ज्वलनशील असते. इथल्या प़क्षकार्यालयांतून, सरकारी कार्यालयांतून आणि सत्तेच्या प्रांगणातून चालणारी शह्-काटशहाची कारस्थाने सर्वसामान्य माणसाच्या डोक्यापलिकडची असली तरी व्यासंगी लोकांसाठी ती एक मोठी संधी असते. इथे येणारा काही स्वार्थ, महत्वाकांक्षा मनात ठेऊनच येत असतो. मानवी मनाचे विविध कंगोरे न्याहाळण्याची मोठी पर्वणी मला येथे दिसते.

पुढच्या काही दिवसांत ते मला मांडता येइल...........