भटक्या

Thursday, March 11, 2010

मी दिल्लीत आल्याला आता चार महीने उलटून गेलेत. डिसेंबर-जानेवारी महिन्यातील बोचरी थंडी जाऊन आता कडक उन्हे जाणवू लागली आहेत.   दिल्लीतल्या वातावरणाला शरिराने जमवून घेतले आहे पण दिल्लीच्या ख़ास अश्या संस्कृतीशी जमवून घेणे अद्यापही सुरूच आहे.

 

दिल्ली आपली राजकीय राजधानी. म्हणून तीचा न्याराच तोरा. रुंद रस्ते, मोठाल्या बागा-बगीचे, भव्य म्हणू शकेल इतक्या मोठ्या सरकारी इमारती, आणि हिंदी भाषेच्या उच्चाराचे असंख्य प्रकार. ही काही वैशिष्ट्ये आपल्याला चटकन जाणवतात.

मराठी माणुस दिल्लीत आल्यावर पहिल्यांदा बावरतो तो हिंदी भाषेला. आपल्याकडे जी हिन्दी भाषा बोलली जाते, त्यात मराठी व्याकरणाचा मोठा प्रभाव असतो. एखाद्याला ' तुम' असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा समोरच्याने ' आपण किंवा तुम्ही ' असा अर्थ घ्यावा अशी आपली अपेक्षा असते. पण दिल्लीत रिक्शावाल्याला जर तुम्ही 'तुम' म्हणाल तर तो अंगावर ओरडत म्हणेल " भाई, ज़रा तमीजसे बात करो." सरकारी कार्यालयात तर मराठी लोकांच्या हिंदी भाषेच्या अडाणीपणामुळे खूप प्रश्न निर्माण होतात.

हिंदीभाषेच्या पाठोपाठ दिल्लीची खाद्यसंस्कृती सुद्धा पचनी पडायला वेळ जावा लागतो. पनीर, आलू, मूली आणि बटर तसेच राजमा, काली दाल इ. चा सर्वव्यापी संचार दिसतो. सुरवातीच्या काही दिवसांत पनीर, आलु यांच्या मार्‍याने इतका वैताग आला की पुन्हा वर्षभर तरी हे पदार्थ खाणार नाही अशी भीम-प्रतिद्ना केली. पण पर्यायी पदार्थांअभावी ती प्रतिद्ना पाळणे फार जड गेले. आताशा भेंडी, मेथी इ. तत्सम पदार्थांच्या 'डिशेस' मिळणार्‍या धाब्यांची माहिती मिळतेय. संधी मिळताच वाट वाकडी करुन आम्ही तेथे जात असतो.

देशाची राजकिय राजधानी, सत्त्ताधिशांची निवासस्थाने, विविध कार्यालये, विदेशी सचिवालये, इ. मुळे दिल्ली शहर राजकिय-सामाजिकदृष्ट्या नेहमीच अत्यंत संवेदनशील-ज्वलनशील असते. इथल्या प़क्षकार्यालयांतून, सरकारी कार्यालयांतून आणि सत्तेच्या प्रांगणातून चालणारी शह्-काटशहाची कारस्थाने सर्वसामान्य माणसाच्या डोक्यापलिकडची असली तरी व्यासंगी लोकांसाठी ती एक मोठी संधी असते. इथे येणारा काही स्वार्थ, महत्वाकांक्षा मनात ठेऊनच येत असतो. मानवी मनाचे विविध कंगोरे न्याहाळण्याची मोठी पर्वणी मला येथे दिसते.

पुढच्या काही दिवसांत ते मला मांडता येइल...........

1 comment: